भाग्यश्रीने गणपतीची आरती केली अन् वडील संतापले! पटवर्धन राजघराण्यात नेमका वाद काय?

Rokhthok Maharashtra 13 0

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री आणि सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यातील वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गणेशोत्सवादरम्यान भाग्यश्रीने सांगलीतील राजघराण्याच्या गणपती मंदिरात आरती केल्यानंतर तिचे वडील विजयसिंहराजे पटवर्धन यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
विजयसिंहराजे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे दत्तक पुत्र युवराज आदित्यराजे पटवर्धन हेच राजगादीचे कायदेशीर वारसदार असून मंदिरातील आरती करण्याचा सन्मान त्यांचाच आहे. जुन्या परंपरा आणि रीतिरिवाज अशा प्रकारे मोडता येणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
भाग्यश्रीने मात्र सांगलीच्या राजघराण्याची परंपरा जपणे ही कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भाग्यश्रीने मंदिरात प्रवेश करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. तसेच, मंदिराच्या गर्भगृहात वाद झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
भाग्यश्री आणि तिचे पती हिमालय दसानी यांच्याकडे यापूर्वी सांगली इस्टेटच्या कामकाजाची जबाबदारी होती. मात्र, आर्थिक आणि जमिनीच्या व्यवहारांवरून मतभेद झाल्यानंतर हे अधिकार काढून घेण्यात आल्याचे सांगितले जाते.
आता गणपती मंदिरातील आरतीवरून निर्माण झालेला हा कौटुंबिक वाद कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.