पुण्यात शेअर बाजाराच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूक!

Rokhthok Maharashtra 18 0

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची तब्बल ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अक्षय दिलीप ननावरे आणि दीपक सुधाकर चौधरी या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुंतवणुकीसाठी आरोपी रोख रकमेची मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा पाच ते दहा टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
ग्रुपमधील सदस्य नफ्याचे स्क्रीनशॉट शेअर करत असल्याने व्यावसायिकाचा आरोपींवर विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख रुपये रोख आणि १९ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले.
यापैकी २५ लाख रुपये परत करून, त्यात साडेचार लाख रुपयांचा नफा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर मुद्दल आणि परतावा न दिल्याने व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अक्षय दिलीप ननावरे, वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर आणि दीपक सुधाकर चौधरी, वय ३३, रा. उत्तमनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ननावरे सध्या परदेशात गेला आहे. तर दीपक चौधरी याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपमधून आणखी काही जणांची फसवणूक झाली आहे का, याचाही तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.