कर्णकर्कश DJ भोवला; पुण्यात १४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Rokhthok Maharashtra 3 0

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठ्या क्षमतेच्या डीजेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या क्षमतेचा साऊंड सिस्टीम वापरून डीजे वाजवल्याप्रकरणी तब्बल १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास शेल पेट्रोल पंप, शंभू कॉलनी, महंमदवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. गणपती स्थापना मिरवणुकीत मोठ्या क्षमतेच्या प्लाझ्मा स्पीकरचा वापर करून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. यावेळी सुमारे ७ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ७०९ ट्रक आणि सुमारे ७ लाख रुपये किमतीची दोन बेस, दोन टॉप साऊंड सिस्टीम आणि मिक्सर मशीन, असा एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बोरिवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अनंत शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोलीस हवालदार संजय देसाई आणि अमोल फडतरे यांनी सहभाग घेतला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.