जमीन व्यवहारात डॉक्टरची 15 कोटींची फसवणूक! माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई
जमीन व्यवहारात डॉक्टरची तब्बल 15 कोटींची फसवणूक आणि आता माजी नगरसेवकासह चौघांवर थेट मोक्का कारवाई! अहिल्यानगरच्या सावेडी परिसरातील हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.
डॉक्टर अनिल आठरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात विश्वास संपादन करून त्यांची 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणात माजी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अमोल बबन जाधव, महेश नारायण कुऱहे आणि भारत फुलमाळी यांच्यावर आरोप आहेत.
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती आणि खोटे मालक उभे केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहाराचे दस्त तयार करून डॉक्टरांकडून वेळोवेळी पैसे घेतल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान अमोल जाधव याला अटक करण्यात आली, तर स्वप्निल शिंदे आणि महेश कुऱहे यांना नाशिक कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार म्हणजेच मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवला. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.





