CSC फिजिकल व्हेरिफिकेशनवर प्रश्नचिन्ह; चालकांची मागणी काय?
भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध सरकारी आणि डिजिटल सेवा देणाऱ्या CSC केंद्र चालकांसमोर नव्या अडचणी निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
CSC ई-गव्हर्नन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया राबवली जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत अधिक व्यवहार असलेल्या केंद्र चालकांचे आयडी सुरू राहतात, तर कमी व्यवहार असलेल्या काही VLE चे आयडी बंद करण्यात आल्याचा दावा केंद्र चालकांकडून केला जात आहे.
अनेक VLE यांनी परीक्षा देऊन आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून CSC केंद्र सुरू केले आहे. मात्र, व्यवसाय कमी असल्याने अपेक्षित व्यवहार होत नाहीत. त्यामुळे काही केंद्र चालक जोडधंदा किंवा इतर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
“व्यवहार कमी आहेत म्हणून आयडी बंद करणे योग्य आहे का? जोडधंदा करणाऱ्या VLE चे काय?” असा सवाल केंद्र चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही VLE यांच्या म्हणण्यानुसार, आयडी बंद करण्यापूर्वी स्पष्ट पूर्वसूचना किंवा पुरेसा वेळ देण्यात आला नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे नियमित KYC, चारित्र्य पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून CSC आयडी सुरू ठेवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच कमी व्यवहार असलेल्या केंद्र चालकांना सुधारणा करण्याची संधी द्यावी, अशीही मागणी आहे.
दरम्यान, फिजिकल व्हेरिफिकेशनचे अधिकृत नियम, आयडी बंद करण्याचे निकष आणि प्रभावित VLE साठी उपलब्ध पर्याय याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
आता CSC प्रशासन केंद्र चालकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





