रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीला नेलं; दोन आरोपी अटकेत!
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालय परिसरात उपचारासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन मारहाण केल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रोहन जगदिश रिडलॉन, वय २४, रा. मुंबई, आणि विशाल प्रकाश चावरिया, रा. घाटी क्वार्टर्स, छत्रपती संभाजीनगर, अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास डोळ्याच्या उपचारासाठी तरुणी घाटी रुग्णालयात आली होती. वॉर्ड क्रमांक ११ कडे जात असताना दोन्ही आरोपींनी तिला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने एसएसबी इमारतीजवळ नेले.
तिथे मारहाण करून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवल्याचा आरोप आहे. त्यानंतर एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन रोहन रिडलॉन याने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, एका सतर्क नागरिकाने डायल ११२ वर माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विशाल चावरियाला ताब्यात घेत तरुणीची सुटका करण्यात आली.
घटनास्थळावरून पसार झालेल्या रोहन रिडलॉनचा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने माग काढत त्यालाही अटक केली.
या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.





