देहूगावातील ओमकार सोसायटीत खळबळ; पतीवर पत्नीच्या हत्येचा संशय!
पुणे जिल्ह्यातील देहूगाव परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर पतीने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली.
शुभांगी आकाश बारस्कर, वय २८ वर्षे, असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचा पती आकाश रामदास बारस्कर, वय २६ वर्षे, हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी पहाटे सहाच्या सुमारास देहूगाव येथील ओमकार हाउसिंग सोसायटीमध्ये ही घटना उघडकीस आली.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाश रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला, तर शुभांगी घरातील खोलीत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत सापडली.
दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शुभांगीला मृत घोषित केले.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, आकाश आणि शुभांगी यांचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये झाला होता. मागील सुमारे एक वर्षापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.
याच वादातून आकाशने पत्नीवर हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर स्वतःवर वार करून गॅलरीतून उडी मारल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.





