अंबईत ट्रेकर्स ग्रुपवर हल्ला! कटच्या कारणावरून मारहाण?
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जकात रस्त्यावरील अंबई परिसरात वाहनांना कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून नामांकित ट्रेकर्स ग्रुपमधील सदस्यांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने वाद घालत ट्रेकर्स ग्रुपमधील चार ते पाच जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर ट्रेकर्सवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या ग्रुपमध्ये नाशिक शहरातील प्रतिष्ठित अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर्स आणि निवृत्त अधिकारी सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्येष्ठ ट्रेकर संजय अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या या ग्रुपवर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुका आणि पर्यटन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुंडगिरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच पर्यटक, ट्रेकर्स आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी संवेदनशील पर्यटनस्थळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशीही मागणी पुढे आली आहे.





