पहूर येथे बेंबळा नदी स्वच्छता अभियान
नांदगाव खंडेश्वर : दि,५,ऑक्टो २६
वाहणाऱ्या बेंबळा नदीपात्रात साचलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पहूर येथील विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यासह गावातील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले होते. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी नदीपात्रात उतरून प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, काचेच्या वस्तू तसेच अन्य घनकचरा गोळा करून नदीपात्र स्वच्छ केले. नदीपात्रातील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत नदी स्वच्छता अभियान राबविल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास मदत होते, असे शिक्षकांनी सांगितले.

या स्वच्छता अभियानामुळे नदीपात्राचा काही भाग कचरामुक्त झाला असून पाण्याचा प्रवाहही काही प्रमाणात सुरळीत झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी तसेच नदी व पर्यावरणाचे महत्त्व त्यांच्या मनात रुजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या अभियानात सामाजिक कार्यकर्ते अभी ठाकरे, संकेत ठाकरे, वेदांत गावंडे, यश मारब्दे, करण शेंडे, राहुल मारोटकर , भुषण खडसे, ज्वाला पळघान, यांच्यासह ग्रामस्थ, युवक आणि शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला.
प्रतिनिधी,
आकाश रुमणे





