साताऱ्यात बापाने मुलीला संपवलं! भानावर येताच AI ला विचारलं- “पुरावे कसे नष्ट करू?”

Rokhthok Maharashtra 6 0

साताऱ्यात बापानेच मुलीची हत्या केली… आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क AI ची मदत मागितली!
साताऱ्यातील गोडोली परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षक पुरुषोत्तम कदम यांनी रागाच्या भरात आपल्या मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केल्याचा आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर काही वेळाने कदम भानावर आले. तब्बल तीन तास ते काय करायचं, पोलिसांपासून कसं वाचायचं, याचा विचार करत होते. त्यानंतर त्यांनी AI ला विचारलं—“माझ्या हातून नकळत मुलीचा खून झाला आहे, पुरावे नष्ट करण्यासाठी काय करावं?”
मात्र AI ने गुन्ह्याला मदत करणारी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला दिला.
यानंतर कदम यांनी रक्ताने माखलेला टी-शर्ट वॉशिंग मशीनमध्ये तीन वेळा धुतला, घरातील रक्ताचे डाग पाण्याने साफ केले आणि रक्ताने माखलेली बॅट टेरेसवर लपवून ठेवली.
त्यानंतर मुलीने स्वतःच भिंतीवर डोकं आपटल्याची खोटी माहिती देत पोलिसांना बोलावलं. मात्र पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान भिंतीवरील रक्ताचे डाग आणि टेरेसवर रक्ताने माखलेली बॅट सापडली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
टीव्हीच्या आवाजावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.