सायबर फसवणुकीसाठी बनावट बँक खाती; वानवडी पोलिसांची मोठी कारवाई

Rokhthok Maharashtra 8 0

पुण्यात सायबर फसवणुकीसाठी म्यूल अकाऊंट म्हणजेच बनावट बँक खात्यांचा वापर करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रवण राजेंद्र अंकुशे, हरिओम हरिराम साहू, सौद इदफान शेख, साहिल रौफ शेख आणि तालीब नूरमोहम्मद शेख यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि KYCच्या आधारे बँक खाती उघडली होती. सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जात होती.या टोळीच्या बँक खात्यांमध्ये देशभरातील १९ नागरिकांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित तब्बल १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
पुण्यातील पाच आरोपींच्या खात्यांमध्येही फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. तपासादरम्यान श्रवण अंकुशे हा टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.आरोपींकडून बनावट खाते उघडण्यासाठी साथीदारांना प्रवृत्त करण्यात येत होते आणि सायबर फसवणुकीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर प्रत्येक व्यवहारामागे पाच हजार रुपये कमिशन देण्याचे आमिष दाखवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.