उंड्रीत टँकरची दुचाकीला धडक; स्वार गंभीर जखमी!
पुण्यातील उंड्री-कडनगर परिसरात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी उंड्री परिसरात टँकरने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
उंड्री परिसरात टँकर आणि डंपरची वाढती वाहतूक आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः कडनगर-उंड्री परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाचे याकडे लक्ष कधी जाणार? टँकर आणि डंपर चालकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनमालकांवर कडक कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहनांची नियमित तपासणी, वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे.





