छेडछाडीच्या वादातून गावात तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू!

Rokhthok Maharashtra 5 0

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावात महिलेच्या छेडछाडीच्या आरोपावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाठ्या-काठ्यांनी झालेल्या या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिलन सोनवणे असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झालं असून, या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या छेडछाडीच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रूपांतर हिंसक हाणामारीत झालं. दोन्ही गटांकडून एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
या हाणामारीत मिलन सोनवणे गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरुवातीला १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे. DYSP विजयकुमार ठाकूरवाड यांच्या माहितीनुसार, गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात हत्येचं कलम वाढवण्यात आलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.