पोलिसांच्या शौर्याला राज्य सरकारचा सलाम! ५० हजारांचा पुरस्कार
महाराष्ट्र पोलीस दलातील धाडसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
कर्तव्य बजावताना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय शौर्य आणि धाडस दाखविणाऱ्या पोलिसांना आता मुख्यमंत्री शौर्य पदक’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
या पुरस्कारामध्ये पात्र पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ५० हजार रुपयांची रोख रक्कम, विशेष पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराची मरणोत्तर तरतूदही करण्यात आली आहे.
दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाणार आहे. पदकांची संख्या निश्चित नसून, प्रत्यक्ष शौर्यपूर्ण कामगिरी आणि प्राप्त प्रस्तावांच्या आधारे पात्र पोलिसांची निवड केली जाणार आहे.
गडचिरोली आणि गोंदियासारख्या नक्षलवाद प्रभावित भागांसह माओवाद, दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, तस्करी आणि गंभीर कायदा-सुव्यवस्था परिस्थितीत धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना या योजनेत गौरवण्यात येणार आहे.
निवड प्रक्रियेत जिल्हा आणि पोलीस आयुक्तालय स्तरावरून प्रस्ताव पाठवले जातील. त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती छाननी करेल. पुढे गृह विभागाच्या वरिष्ठ पातळीवर विचार होऊन अंतिम प्रस्ताव गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला राज्यस्तरीय ओळख मिळणार असून, धाडसी सेवेला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.





