प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी कारवाई! अल्टो कार जप्त; कर्नाळा जंगलातून पिस्तूल-मोबाईल हस्तगत
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला मोठं यश!
ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप ऊर्फ बाळा पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत.
आरोपी नितेश पवार याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि गावठी पिस्तूल कर्नाळा जंगल परिसरातून जप्त करण्यात आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी अल्टो कारमधून फरार झाले होते. कर्नाळा परिसरात हत्यारं लपवल्यानंतर आरोपी पुढे गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली अल्टो कारही पोलिसांनी जप्त केली असून, एमजीएम रुग्णालयापासून काही अंतरावर ही कार सोडून देण्यात आली होती. कार ज्या ठिकाणी आढळली, ती जागा पाहून पोलिसांनाही धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.
या हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, आरोपींचे सीडीआर आणि संपर्क तपासले जात आहेत. सुपारी देऊन नियोजित हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे.
दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ ९ ऑक्टोबरला ठाण्यात विरोधकांचा शांततापूर्ण मोर्चा निघणार आहे.





