पुण्यात १११ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त! काळेपडळमधून दोघांना अटक
पुण्यातील काळेपडळ परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १११ ग्रॅम मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुशरफ इसाक शेख (वय २५) आणि सोहेल बाबूलाल शेख (वय २५) अशी आहेत. हे दोघेही काळेपडळ येथील नेहरू पार्क परिसरातील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, काळेपडळमधील समृद्धी चौक रस्त्यालगत रेल्वे लाइनच्या भिंतीजवळ हे दोघे संशयास्पदरीत्या थांबले होते. गस्तीवर असलेल्या अमली पदार्थविरोधी पथकाला त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे १११ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले.
या कारवाईत मोबाईल आणि दुचाकीसह सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त हसन गौहर, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, आशा भिंगारे आणि त्यांच्या पथकाने केली.
आरोपींविरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमडी ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा तपास पोलीस करत आहेत.





