८ महिन्यांच्या बाळाचा १.८० लाखांत सौदा! सख्ख्या बापानेच विकलं पोटचं बाळ?
सहा मुलींची आई बनली ८ महिन्यांच्या बाळाची खरेदीदार! चक्क १ लाख ८० हजार रुपयांना बाळाचा सौदा; सख्ख्या बापानेच पोटच्या गोळ्याला विकल्याची धक्कादायक घटना!
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असल्याने एका पित्याने आपल्याच आठ महिन्यांच्या बाळाचा सौदा केल्याचा आरोप आहे.
मंडावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आराम सिंह मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रिक्षा घेण्यासाठी पैसे नसल्याने तो आर्थिक अडचणीत होता. याचाच फायदा घेत समशेर आणि खूशनूद या दोन दलालांनी त्याला बाळ विकण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर खुशहालपूर येथील देवराज सिंह आणि त्यांची पत्नी सुनीता यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आठ महिन्यांच्या बाळाचा तब्बल १ लाख ८० हजार रुपयांना सौदा करण्यात आला.
मात्र, काही दिवसांनी बाळापासून दूर राहणे सहन न झाल्याने आराम सिंहने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करून बाळाला पुन्हा त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवलं.
धक्कादायक बाब म्हणजे, सुनीताला सहा मुली असून मुलगा नसल्यामुळे तिने बाळ विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. या प्रकरणी बाळाच्या आई-वडिलांसह खरेदीदार दाम्पत्य आणि दोन्ही दलालांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.





