पुण्यात पुन्हा गोळीबार! मांजरीत मित्रानेच मित्रावर झाडली गोळी

Rokhthok Maharashtra 5 0

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत! मांजरी परिसरात किरकोळ वादातून थेट गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, गोळीबार करणारा आणि गोळी लागून जखमी झालेला, दोघेही एकमेकांचे मित्र असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील अक्षय गार्डन परिसरात मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र, या वादाचं रूपांतर थेट गोळीबारात झालं.
या घटनेत एका तरुणाच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तो घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. तर गोळीबार करणारा आरोपीही घटनास्थळावरून पसार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जखमी व्यक्तीसह गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
विशेष म्हणजे, याच काळात पुणे न्यायालय परिसरातही हत्या आणि गोळीबाराच्या प्रयत्नाची घटना समोर आली होती. त्यामुळे पुणे आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मित्रांमधील किरकोळ वाद थेट गोळीबारापर्यंत पोहोचत असेल, तर पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.