Uncategorized

संत तथा एक समाजसुधारक गाडगेबाबा

ग्राम स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती, धर्मशाळा व शाळा रुग्णालय शाळा वसतिगृह उभारणी करणारे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे संत गाडगे बाबांची आज पुण्यतिथी(२० डिसेंबर १९५६). या थोर विभूतीला विनम्र अभिवादन.

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे अंजनगाव सुर्जी तालुक्यात जन्म दि.२३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. संत गाडगेबाबांचा पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. संत गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्यापासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे महान संत गाडगे बाबा होत.

संपुर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्याबदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता किर्तन करायचं, त्यातुन समाज प्रबोधन करायचं, समाज कल्याणाचा प्रसार प्रचार करायचा.

आपल्या किर्तनात ते गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला नामाचा गजर, हरिपाठ, तसेच संत कबीरांच्या दोहयांचा देखील उपयोग करत असत. यातून फार मोठे प्रबोधन संत गाडगे बाबा करित असत.

गाडगे बाबा ज्या ही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता झाल्यानंतर गावक.यांना गांव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत.

गावातुन मिळालेल्या पैश्यातुन गाडगे महाराजांनी अनेक शाळा, धर्मशाळा, रूग्णालयं आणि जनावरांकरता गोशाळा देखील उभारल्या. गाडगे महाराज जनतेला जनावरांवर होत असलेल्या अत्याचारापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. समाजात चालत असलेल्या जातीभेद आणि वर्णभेदाला संपवण्याकरता त्यांनी खुप प्रयत्न केले.

विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली.

अशा या थोर विभूतीच्या प्रबोधनात्मक स्वच्छता अभियानच्या कार्याची जाणीव समाजात रहावी म्हणून गाडगे महाराजांच्या कार्याचा सन्मान करत महाराष्ट्र शासनाने 2000-01 मधे ’’संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची’’सुरूवात केली. जे ग्रामस्थ आपल्या गावाला स्वच्छ ठेवतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

शासनाने ही परंपरा प्रभावीपणे, सातत्याने राबवायला हवी, जेणेकरुन यथोचित अभिवादन ठरू शकेल.

संकलन: सुधीर मेथेकर