पुणे

भोसरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,१४ वर्षानंतर आरोपीस अटक, अनैतिक संबंधाला अडथळा, मैत्रिणीचा अपहरण करून केला होता खून

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

पुणे: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला चौदा वर्षानंतर भोसरी पोलिसांना यश आले आहे. *अप्पा गोगाजी मोहिते (वय – ५०, रा. भोसरी)* असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अप्पा गोगाजी मोहिते हा भोसरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या प्रकाश चव्हाण गँगचा सक्रिय सदस्य आहे. भोसरी परिसरात रहात असताना एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधात तिची मैत्रीण अडथळा ठरत होती.

अखेर आरोपीने तिचे पिंपरी येथून अपहरण केले आणि तिच्याच घरात ठेवून तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर त्याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अप्पा मोहिते हा अनेक ठिकाणी नाव आणि पत्ता बदलून रहात होता. गेल्या १४ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच त्याचा कोणताही फोटो पोलिसांकडे नसल्याने जुन्या फोटोवरून त्याला ओळखणे अवघड होते. सुमारे १५ वर्षांपासूनचे सहआरोपी आणि चव्हाण गँगच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करण्याचे ठरवले.

दरम्यान, तपास करत असताना तो खेड तालुक्यातील वाकी येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले तर, चाकण एमआयडीसी येथे मजुरीचे काम करत असून लवकरच तो औरंगाबाद येथे जाणार असल्याची माहितीहि पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माझ्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या मैत्रीचे अपहरण करून तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.