पुणे

“गाडी हळू चालव बाळा म्हणल्याने राग मनात धरून चारचाकी वाहन चालकावर प्राणघातक हल्ला : चार आरोपींविरुद्ध हडपसर मध्ये गुन्हा दाखल…

पुणे, दि.25 (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज )

गाडी हळू चालव बाळा, सांगितल्याचा राग आल्याने चारचाकी चालकावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. साडेसतरा नळी ग्रामपंचायत शेजारी सदर प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ऍडव्होकेट अभिजीत पांडूरंग वाळूंज हे आपल्या स्विफ्ट चारचाकीतून शिवाजीनगर कोर्टातून घरी परत येत असताना गाडी समोर वेगाने येणाऱ्या इसमाला गाडी हळू चालव बाळा म्हणताच त्याचा राग आल्याने आरोपी बरोबर वादावादी झाली. यावेळी आरोपीने बघून घेतो असा दम दिला. काही वेळा नंतर आरोपीने इतर तिघा सोबत येऊन फिर्यादी वकील यांच्या घराबाहेर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी वकील घरा बाहेर पडताच चौघा आरोपींनी हल्ला चढवला. यावेळी एकाने शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी वकीलाने हाताने वार थांबवला यावेळी हातास गंभीर इजा पोहचली. मारहाण करून आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला.
याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरचे पोलीस करत आहेत.