पुणे

ज्येष्ठ आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे आणि ज्येष्ठ इंजिनियर कुमार गेरा यांना जीवनगौरव प्रदान – ‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ च्या शानदार कार्यक्रमात सतीश मगर यांच्या हस्ते सन्मान

पुणे :

‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ कडून ज्येष्ठ आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे(नरेंद्र डेंगळे असोसिएट्स) , ज्येष्ठ सिव्हिल इंजिनियर कुमार गेरा(गेरा डेव्हलपमेंट्स प्रा.लि.) यांना क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला.

दि १७ फेब्रुवारी रोजी पी वाय सी हिंदू जिमखाना टेरेस येथे सायंकाळी ६ वाजता ‘ हा शानदार कार्यक्रम झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येकी एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एक ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो.या पुरस्कारांचे हे १६ वे वर्ष होते.

कार्यकारी समितीतर्फे पुष्कर कानविंदे यांनी प्रास्ताविक केले. शेखर गरूड यांनी सूत्रसंचालन केले. असोसिएशनचे सचिव संजय तासगावकर यांनी आभार मानले.असोसिएशनचचे चेअरमन महेश बांगड, विश्वास कुलकर्णी, असोसिएशनचे उपाध्यक्ष राजीव राजे,हेमंत खिरे, संजय तासगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना सतीश मगर म्हणाले , ‘ प्रत्येक शहराच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. शहरं संकटात आहेत. हे संकट वाढलं तर सर्व व्यवसाय संकटात जातील.एफएसआय संकल्पनेवर विचार केला पाहिजे. सरकार दरबारी भेदभाव होता कामा नये. शहरांचं राहणीमान(लिव्हिएबिलिटी ) सुधारली पाहिजे ,पण शोषण( एक्स्प्लॉयटेशन ) वाढता कामा नये. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.बांधकाम क्षेत्र ही दुभती गाय असे सरकारांना वाटतं. पण, ती जगली पाहिजे. संसाधने तीच राहणार आहेत, पण गर्दी वाढत आहे. मूलभूत संकल्पनांना जपले पाहिजे. तरच या क्षेत्राला उज्वल भवितव्य राहील.

सत्काराला उत्तर देताना कुमार गेरा म्हणाले, ‘ मी या क्षेत्रात कार्यरत आहे, कारण या क्षेत्रातील कामावर माझे प्रेम आहे. निवृत्तीचा विचार माझ्या मनात नाही. कोणाचाही द्वेष आणि मत्सर करु नये, या मताचा मी आहे. आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नये, तणावमुक्त रहा, सकारात्मक राहा,असा सल्ला मी या क्षेत्रातील नव्या पिढीला देईन. आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे यश देखील आनंददायक वाटले पाहिजे.फाईल पुढे जाण्यासाठी, अनुकुल निर्णय मिळविण्यासाठी विविध कार्यालयांमधून बक्षीसी देणे या क्षेत्राने थांबवले पाहिजे. ते सर्वांच्या हिताचे, देशहिताचे आहे.त्यामुळे आपला क्लायंट हातातून जाईल, अशी भीती बाळगता कामा नये. या क्षेत्रातील व्यावसायिकांनी गुणवत्तापूर्ण कामातून आपले गुडविल, प्रतिष्ठा वाढवत नेले पाहिजे.

नरेंद्र डेंगळे म्हणाले, ‘ आर्किटेक्ट, अभियंते वेगवेगळे काम करीत असले तरी त्यांचे उद्दीष्ट एक असते. चांदणी चौक आता चौक न राहता वाटोळे झाले आहे.चांदणी चौक, टेकडया का पाडल्या जात आहेत. हे अभियंते, आर्किटेक्ट आणि आपल्या सर्वांचे अपयश आहे. स्थानिक परिसराच्या इतिहास, भूगोलाची जपणूक आपल्या कामातून केली पाहिजे.

‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’:५३ वर्षांची परंपरा

‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ ही ५३ वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि नीतिमान सेवांना उत्तेजन देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊन नागरी,सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहण्यासाठी ही संस्था स्थापन झाली.सभासदांची वर्गणी आणि प्रायोजकत्वातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये चर्चासत्रे,प्रशिक्षण ,विविध पुरस्कारांचा समावेश आहे.