पुणे

जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांकडून नव्या पिढीने शिकले पाहिजे :- खा. श्रीनिवास पाटील

 शिवाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सृजशील गौरव अंकाचे प्रकाशन

पुणे, ता. 24 ः जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांकडून हे नव्या पिढीने शिकले पाहिजे. समाजशीलता व संवेदनशीलता यामधून निर्माण झालेला सृजनशील कार्यकर्ता समाजाच्या विकासासाठी झगडतो, त्यांना समाज स्वतःहून स्वीकारतो, त्यातील कार्यकर्ता म्हणून शिवाजीराव पवार यांचे नाव पुढे येते. मात्र, अलीकडे अशा कार्यकर्त्यांची पोकळी निर्माण झाली आहे, अशी खंत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.

माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त सृजनशील गौरव अंकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. के. राऊत, डॉ. आबनावे, जगन्नाथ शेवाळे, गौरव अंकाचे संपादक सुधीर मेथेकर, माजी नगरसेविका रंजना पवार, सुरेखा कवडे, विजया कापरे, पल्लवी प्रशांत सुरसे, मनीषा राऊत, साधना बँकेचे अध्यक्ष सुरेश घुले, उपाध्यक्ष रोहिणी तुपे, संचालक विकास तुपे, प्रताप पवार, डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, उपाध्यक्षा सविता मोरे, भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक सुरेश घुले, माजी महापौर वैशाली बनकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांचा आदेश म्हणून काम करणारा आणि कामगार हितासाठी संघर्ष करणारे नेते शिवाजी पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केले. समाजाप्रति संवेदशील, सृजनशील व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याच्या आदर्श घेत राजकारणात आम्ही यशस्वी झालो असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सत्काराला उत्तर देताना शिवाजी पवार म्हणाले की, स्व. राम तुपे, विठ्ठल तुपे पाटील, दादा गुजर यांच्या विचारांच्या मुशीमध्ये आम्ही घडलो. आयुष्यभर काम करणारा मी कार्यकर्ता आहे, जमिनीवर राहून काम करावे, हा माझा सन्मान नाही, माझ्या कुटुंबाचा आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्रा. जे. पी. देसाई यांनी केले. डॉ. स्नेहल पवार यांनी संदेश वाचन केले. सुरेश वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पवार, पंढरी पवार, नरेंद्र सावंत, कन्हय्या पालेषा, शाम काळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वर्षा पवार यांनी आभार मानले.