पुणे

“पेपरफुटी आणि कॉपी करण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक ! – उपसंपादक सुधीर मेथेकर यांचा विशेष लेख”

सध्या दहावी व बारावीच्या परिक्षा चालू आहेत, तसतसे पेपरफुटीचे आणि कॉपी करण्याचे/पुरविण्यात येत असल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत आहे ! अन् यात कहर म्हणजे काही ठिकाणी सामुदायिक कॉपी होत असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर कॉपी पुरविण्यार्या जमावाने भरारी पथकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हे असं घडत असताना शिक्षणाचा दर्जा चांगला कसा असू शकेल असे वाटते.

खरं तर “कॉपी” हा प्रकार शिक्षणाला लागलेली किडच म्हणावे लागेल. परिक्षाकाळात कॉपीचे प्रकार का घडतात हे सर्वांना माहीत आहे, परंतु त्यावर आळा बसत नाही हे खेदाने म्हणावे लागते. परंतु या कॉपी / सामुदायिक कॉपी प्रकारांमुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होतो तसेच शिक्षणातील दर्जा घसरण्यास एक प्रकारे मदतच होते.

मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे अन् आता त्यात पेपरफुटी व सामुदायिक कॉपीमुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारणा करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत, नसता पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही !

तसे पाहिले तर कॉपी करणे हा प्रकार नवीन नाही, अभ्यास न करता पास होण्याचा सोपा मार्ग म्हणून काही विद्यार्थी याकडे पहाताना दिसून येतात. तसेच पेपर फुटीच्या प्रकारात निव्वळ विद्यार्थ्यांना दोषी धरून चालणार नाही कारण जेथे पेपर / प्रश्नपत्रिका सेट होतो, तयार करण्यात येतो तेथून त्याला पाय फुटतात ! पाय का फुटतात असे विचारले तर येथे आर्थिक व्यवहार घडत असल्याचे निदर्शनास येतात. म्हणजे येथे अभ्यास न करणाऱ्यांचेच हात गुंतलेले असावेत असे निदर्शनास येते.

देशाची तरुण पिढी हुशार व सक्षम होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. सामुहिक कॉपी प्रकार, पेपर फुटीला प्रोत्साहन न देता विद्यार्थ्यी, पालक, शिक्षणसंस्था आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जाणीव पूर्वक सकारात्मक पावले उचलली पाहिजेत.

माणसंतज्ञांनी शालेय, महाविद्यालयात उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करायला हवे, तशी व्यवस्था शाळा, महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांनी करायला हवी तर देशाचे उज्वल भविष्य फार दुर रहाणार नाही असे वाटते, आता नाही असे नक्कीच नाही परंतु जे काही थोडेफार असे प्रकार घडून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहेत ते थांबतील आणि शंभर टक्के देशाला प्रगतीपथावर नेणारी सक्षम पिढी घडत राहील.