पुणे

करुणा आणि संपत्तीचा मेळ घालून माणुसकीचे काम करा : डॉ.संचेती.

पुणे : समाजातील सक्षम नागरिकांनी करुणा आणि संपत्तीचा मेळ घालून माणुसकीचे काम केले तर पुढील पिढ्यांसाठी एक आशादायक जग निर्माण होईल,असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांनी स्नेहालय संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले. संकटग्रस्त महिलांकरीता पुणे येथे स्नेहाधार, हा उपक्रम स्नेहालय संस्था चालवते.

 

सामाजिक क्षेत्रात निरलस योगदान देणाऱ्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी “स्नेहाधार गौरव पुरस्कार ” देण्यात येतो.
चौथ्या वर्षीचे पुरस्कार वितरण पुण्यातील प्रसिद्ध शल्यविशारद पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांच्या हस्ते झाले.

 

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव आणि विकलांगांसाठी काम करणाऱ्या पण स्वतः विकलांग असणाऱ्या अमरावतीच्या राजश्री पाटील यांना यंदाचे स्नेहाधार गौरव पुरस्कार देण्यात आले.
नंदिनी जाधव यांनी आपले ब्युटी पार्लर चे काम बंद करून ग्रामीण आणि शहरी भागातील अंध श्रध्दा निर्मूलनाचे काम करताना जटा मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.त्यांनी जवळ जवळ साडे तीनशे स्त्रियांना जटा मुक्त केले आहे.यातील स्त्रिया स्वतःच मानसिक दृष्ट्या जटा ठेवण्याच्या विरूध्द नसतात.त्यांना,त्यांच्या नातेवाईकांना सल्ला देऊन या अंध श्रद्धेतून त्यांना मुक्त करण्याचे महत्वाचे काम त्या करत आहेत.

 

राजश्री पाटील एम फिल करत असताना अपघात ग्रस्त होऊन त्यांच्यावर पाठीच्या मणक्यांच्या जखमेमुळे व्हील चेअर वरच पुढील आयुष्य जगण्याची वेळ आली. स्वतःचे नैराश्य,शारीरिक पीडा यावर मात करून त्यांनी मुलांच्या शिकवण्या सुरू केल्या.आता त्या अशा व्हील चेअर वरच जीवन असणाऱ्या इतर व्यक्तींची कार्यशाळा घेऊन त्यांचे नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कार्यक्रमाचे प्रायोजक आप्पा अष्टेकर यांनी अहमदनगरच्या स्नेहालय या संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत असे अनेक कार्यकर्ते समाजात निर्माण व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संचेती यांनी आपल्या यशाचे मूळ आई वडिलांचे सुसंस्कार असल्याचे नमूद करत आपल्याला माणूस म्हणून मिळत असलेला भरपूर वेळ माणूसकीच्या कामासाठी सर्वांनी द्यावा ही सगळ्यांना विनंती केली.
धनंजय आणि कविता खरवंडीकर यांनी त्यांची कन्या श्रुती हिच्यासह सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम सादर केला.