पुणे

शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.26-सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून त्याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, हे अभियान सामान्य नागरिकाच्यादृष्टीने खूप महत्वाचे असून जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे. अभियानांतर्गत नागरिकांना देण्याच्या सेवा व योजनांची माहिती राज्य शासनाने दिली आहे. त्यांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. विविध शासकीय यंत्रणांनी अधिकाधिक सेवांचा यात समावेश करावा. स्थानिक लोकप्रतिनिधींना यात सहभागी करून घ्यावे. गांभिर्याने, पारदर्शकपणे आणि संवेदनशीलतेने शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात 30 मे रोजी तालुकास्तरावर ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून 40 विविध सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात दीड ते दोन लाख नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्रीमती कदम म्हणाल्या, 30 मे रोजी होणाऱ्या शिबिरासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात यावा. योग्य नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांना मेळाव्याची माहिती देण्यासाठी आवश्यक पूर्वप्रसिद्धी करावी. जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचेदेखील नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.