पुणे

वारी पंढरीची २०२३ … देव भक्त एके ठायी | संतमेळ तया गावी || ते हे जाणा पंढरपूर | देव उभे विटेवर || संत एकनाथ महाराज

आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी / महा एकादशी / देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपास करणे किंवा दिवसभर उपासाचे खाणे असा नसुन थोडा वेगळा आहे. उपवास याचा मुळ अर्थ जवळ जाणे (उप + वास) असा आहे. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे, त्याची आराधना करणे. परमात्म्याचे स्मरण करणे, त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास.

महाराष्ट्रातील विशेषत: भागवतधर्मीय या दिवशी उपवास तर करतातच पण शक्य तर पंढरीची वारी करुन श्रीविठ्ठ्ल दर्शन घेतात. नच जमले तर गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात.

 

ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानाचे प्रतीक, तुकोबाराय हे भक्तीचे प्रतीक, नामदेव राय हे प्रीतीचे प्रतीक, समर्थ रामदास हे क्रांतीचे प्रतीक तर नाथमहाराज हे शांतीचे प्रतीक आहे. ज्ञान, भक्ती, प्रीती, शांती आणि क्रांती या पंचतत्वाने महाराष्ट्राच्या लोकजीवनात प्रबोधनाची वाटचाल घडू लागली. या सकल संतांच्या विचारतत्त्वाचे एक विराट दर्शन म्हणजे पंढरीची वारी असल्याचे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी त्यांच्या “वारी – स्वरूप आणि परंपरा” या पुस्तकात म्हंटलं आहे.

यंदाच्या वर्षी दोन्ही पालख्याचे आगमन हडपसर येथे 14 जून ला होत आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीला कोणीही निमंत्रण देत नसताना देखील लाखो वारकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. पंढरीची वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक संस्कार प्रवाह व विराट दर्शन आहे याची जाणीव होते.

 

पंढरीच्या वारी मध्ये भेदभाव न माननारे लाखो शिस्तबद्ध वारकरी सहभागी होतात हा एक जागतिक विक्रम आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अशा या वारीच्या स्वागतासाठी / दर्शनासाठी हजारो भक्त मंडळी सहभागी होतात. या वारी मध्ये अभ्यासक, परदेशी नागरिक, सर्व धर्माचे मंडळी सहभागी होतात. विठ्ठल आणि पंढरपूरच्या ठायी एक भावनिक नाते जोडले गेले आहे म्हणूनच म्हणतात :

माझे माहेर पंढरी | आहे भीवरेच्या तिरी |
बाप आणि आई | माझी विठ्ठल रखुमाई ||

या आषाढी एकादशी दिवसापासून चतुङ्र्कास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी).

पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३ मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली.

 

चंद्रभागेच्या वाळवंटा (नदीकाठच्या छोटय़ाशा वाळूच्या मैदाना) पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५2 मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला ‘नामदेव पायरी’ म्हणतात. कोपर्‍यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.

अशा पंढरीची महत्त्व सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात:

देव भक्त एके ठायी | संतमेळ तया गावी ||
ते हे जाणा पंढरपूर | देव उभे विटेवर ||
भक्त येती लोटांगणी | देव पुरवी मनोरथ मनी ||

विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी फार सुंदर अभंग लिहिला आहे तो :

सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती |
रखुमाईच्या पती सोयरिया |
गोड तुझें रूप गोड तुझें नाम |
देईं मज प्रेम सर्वकाळ ||

अशा या पंढरीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांना दर्शनाने मानसिक समाधान मिळते, मनोकामना पूर्ण होणार म्हणून अत्यानंद झालेल्या वारकर्यांच्या आणि विठ्ठल भक्तांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतो हे दृश्य पहायला मिळते. सर्व भक्तगण, भाविक, लहान थोर मंडळी हा वारकऱ्यांच्या सोहळा पाहून आनंदाने न्हावून निघतात.

संत ज्ञानदेव तुकाराम !
पंढरीनाथ महाराज की जय !!

सुधीर मेथेकर,
हडपसर, पुणे