पुणेमहाराष्ट्र

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न

पुणे- रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती कार्यक्रम संपन्न झाला. मा. राम कांडगे, उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. विकास देशमुख, सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा हे होते. या कार्यक्रमाला मा. किसन रत्नपारखी, विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा, मा. एस टी पवार, सहायक विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा, मा. अरविंद जाधव, मुख्याध्यापक, प्राथमिक विद्या मंदिर, औंध मा. सूर्यकांत सरवदे, सचिव, माजी विद्यार्थी संघटना, डॉ. रमेश रणदिवे, इ. मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. विकास देशमुख म्हणाले, “कर्मवीरांच्या १३६ व्या जयंती निमित्ताने आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कर्मवीरांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे पसरविले. ग्रामीण भागातील मुलांचा शिक्षणासाठी राहण्याचा प्रश्न वसतिगृहाच्या माध्यमातून सोडवला. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालये काढली. कर्मवीरांनी लावलेल्या वटवृक्षाच्या सावलीत आपण सर्वजण पुढे जात आहोत. कर्मवीरांनी लावलेल्या वटवृक्षाच्या शाखा आज बहरल्या आहेत. आपण भविष्यात उत्तुंग भरारीच घ्यायला हवी. तरच आपण कर्मवीरांचे पाईक आहोत.” असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. राम कांडगे म्हणाले, “भारताच्या सार्वत्रिक शिक्षणाचे प्रणेते कर्मवीर होते. त्यांच्या कार्यात आपल्या जीवनाच्या समिधा अर्पण करणाऱ्या सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना आपण विसरून चालणार नाही. आपल्या रयत शिक्षण संस्थेचा इतिहास आणि परंपरा समजून घेऊन पुढील दिशा ठरवायला हवी. कर्मवीर सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. जलस्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम त्यांनी केले. म. फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून आणि विचारातून छ शिवाजी महाराजांच्या आदर्शातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी एकत्र वसतिगृह निर्माण करून समाज पुनर्रचनेचे कार्य कर्मवीरांनी केले. त्यांच्या कार्याचा जागर करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.” असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

 

यावेळी कर्मवीरांच्या जीवनावर ऑनलाईन घेतलेल्या परीक्षेतील गुणानुक्रमे पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. राजेंद्र रासकर, डॉ. देवकी राठोड, प्रा. सुशीलकुमार गुजर, प्रा. बाळासाहेब कल्हापुरे, ग्रंथपाल बद्रीनाथ ढाकणे, प्रा. कल्याणी सोनवणे, प्रा. आसावरी शेवाळे,  सखाराम शिंगाडे, विद्यार्थी प्रतिनिधी शुभांगी शिंदे इ. नी प्रयत्न केले. रयत गीताने सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.