पुणेमहाराष्ट्र

खाकीच्या खाक्याने चोरी पकडली अन् त्याच्यावर गुन्हा

कोंढवा पोलिसांची कामगिरी ः
अशोक बालगुडे
उंड्री ः आठ तोळे वजनाचे सोन्याच्या दागिन्याची चोरी करणाऱ्याकडून खाकीच्या खाक्याने चोरी पकडली अन् त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर, कोंढवा बु।।, पुणे येथे 25 ऑगस्ट ते 6 नोव्हेंबर, 2023 दरम्यान चोरीची घटना घडली होती. आरोपी एलएलबीचे शिक्षण घेत आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या कुटुंबीयांकडे तपास करीत असताना हा गुन्हा एकानेच केला असल्याचा संशय आला. संशयित मुलाला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्यासमोर मानसशास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्याच्यासमोर सराईत गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत तपास सुरू केल्याचे त्याने पाहिले, तेव्हा त्याला घाम फुटला. आपल्यावरही असा प्रयोग होऊ शकतो, या भीतीने त्याने तोंड उघडले आणि चोरी केल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून चार लाख रुपयांचे 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, निलेश देसाई, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, ज्ञानेश्वर भोसले, सुजीत मदन यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.