पुणे

“आढळराव पाटील यांची विजयाची भिस्त पाच आमदारांवर? डॉ.अमोल कोल्हे यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून अपेक्षा…

“हडपसर व भोसरी निर्णायक मतदार, ग्रामीण भागात वर्चस्व कोणाचे?

“मतदान टक्का घसरल्याचा फटका महायुती की महाविकास आघाडीला? विशेष रिपोर्ट

पुणे (अनिल मोरे )

महाराष्ट्रात सर्वात अटीतटीची व प्रतिष्ठेची ठरलेली शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली, गतनिवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली असली तरी वाढलेल्या मतांमुळे 85हजार मतदारांची भर पडली आहे, महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची भिस्त पाच आमदारांवर आहे तर केवळ एक आमदार असलेल्या महाविकासआघाडीच्या डॉ.अमोल कोल्हे यांना पनिष्ठावंत कार्यकर्त्यांकडून मोठी आशा आहे, हडपसर व भोसरी कोणाच्या पारड्यात मते टाकणार यावरून शिरूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे. बैलगाडा शर्यत वरून गाजलेल्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील की डॉ.अमोल कोल्हे मैदान मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली हडपसर भोसरी या शहरी मतदारसंघासह जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव या चार ग्रामीण मतदार संघाचा समावेश यामध्ये आहे.
महायुती कडून ऐनवेळी शिवसेना शिंदेगटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात होते, तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ.अमोल कोल्हे यांनी खिंड लढवली. महाविकास आघाडी कडून शरद पवार यांनी तर महायुतीकडून अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

सभा, रॅली, पदयात्रा, मेळावे, आरोप – प्रत्यारोप यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली, आढळराव पाटील यांनी डॉ.कोल्हे यांचा जनसंपर्क मतदारसंघात कमी आहे ते अभिनेते आहेत अभिनेता पाहिजे का नेता असे सांगून खिल्ली उडवली तर डॉ.अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीचा उपयोग कंपनीचे उखळ पांढरे करण्यासाठी केला असा प्रतिआरोप केला, विकासावरून वैयक्तिक मुद्द्यांवर आलेली ही निवडणूक राज्यभर गाजली, महाविकास आघाडी कडून शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, विश्वजीत कदम, ओमराजे निंबाळकर या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या तर महायुतीकडून नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर यांच्या सभा चांगल्याच गाजल्या.

महायुतीच्या आढळराव पाटील यांच्याकडून या मतदारसंघात पाच विद्यमान आमदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून एकच आमदार प्रचार करत होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने त्यांनी सर्व आमदार व पदाधिकारी कामाला लावले होते, हडपसर मधून विद्यमान आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सुरेश घुले यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली.
डॉ.कोल्हे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दुसरी फळी प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हडपसर मध्ये किल्ला लढवत होती तर शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसत होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी फळी, प्रामाणिक शिवसैनिक व काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता ही डॉ.कोल्हे यांच्या प्रचाराची जमेची बाजू होती, तर महायुतीकडून नेत्यांची पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठी फौज आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचारात पुढाकार घेत होती, दोन्हीकडून चांगले प्रयत्न झाले परंतु हडपसर व भोसरी हा निर्णायक मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात कोणाला आघाडी मिळेल त्यावर विजयाचे गणित अवलंबून आहेत त्यातच या मतदारसंघातच मतदान कमी झाल्याने दोन्ही उमेदवारांच्या चिंतेत भर पडली आहे.

 

महायुतीचे आढळराव पाटील यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारातील व्यस्त होते तर डॉ.कोल्हे यांनी सक्षम प्रचार यंत्रणा राबवली होती, भोसरीतून भाजपचे महेश लांडगे यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली तर शिरूर मधून अशोक पवार यांनी प्रामाणिकपणे शरद पवार यांच्यावरची निष्ठा प्रचारात दाखवून दिली,
अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत आमदारांना पदाधिकाऱ्यांना धमकी देण्याचे प्रकार घडले हे मतदारांना कितपत रुचते हे निकालात दिसेल, आढळराव पाटील यांनी आक्रमकपणे डॉ.कोल्हे यांच्यावर टीका केली, डॉ.कोल्हे यांनीही या सर्व टीकेलासडेतोड उत्तर दिले, दोन्ही उमेदवारांकडून केलेला विकासकामांचा दावा मतदारांवर कितपत प्रभाव टाकण्यात यशस्वी होतो हे चार जूनच्या निकालात दिसून येईल.

“महायुतीच्या आढळराव पाटील यांच्या जमेच्या बाजू…
:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ताकद..
:- सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार…
:- शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर महायुतीत सामील झालेले माजी नगरसेवक व पदाधिकारी
:- पंधरा वर्षे खासदार म्हणून केलेली कामगिरी आणि दांडगा जनसंपर्क…
:- उशिरा उमेदवारी जाहीर होऊनही सहा विधानसभा मतदारसंघात राबवलेली सक्षम प्रचार यंत्रणा..

“महाविकासआघाडीचे डॉ.अमोल कोल्हे यांची जमेची बाजू…
:- शरद पवार यांच्यासारखा तगडा व मुरलेला नेता भक्कमपणे पाठीशी…
:-पाच वर्षे खासदार म्हणून संसदेत प्रभावी भाषणे व तीन वेळा संसदरत्न पुरस्कार…
:- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पोचविणारा चेहरा घराघरात…
:- पक्ष फुटी नंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केलेले प्रामाणिक काम….
:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना उबाठा व काँग्रेसने दिलेली भक्कम साथ..

मतदान झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अडीच लाखांनी निवडून येणार असा दावा केला तर डॉ.अमोल कोल्हे यांनी मतदार मलाच निर्णायक कौल देणार असल्याने दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचा दावा केला आहे, अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत आढळराव चौथ्यांदा खासदार होतात की डॉ.अमोल कोल्हे दुसऱ्यांदा संसदेत जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….