पुणेमहाराष्ट्र

आपले भविष्य भारतीय संविधानची” नववी आवृत्ती प्रकाशित

सुभाष वारे यांनी लिहिलेल्या “आपले भविष्य भारतीय संविधान” या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचे प्रकाशन सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते आज झाले. डॉ. बाबा आढाव यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी शीलाताई आढाव, एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष लोमटे, हमाल मापाडी महामंडळाचे शिवाजी शिंदे, हमाल पंचायत, पुणेचे सरचिटणीस गोरख मेंगडे, कामगार नेते संतोष नांगरे, महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस शारदा वाडेकर, फाउंडेशनचे सहसचिव टी उपेंद्र, व्यवस्थापक राहुल भोसले उपस्थित होते. या पुस्तकाच्या आधीच्या आठ आवृत्त्या मिळून एकूण त्रेचाळीस हजार पुस्तकांची विक्री आज अखेर झालेली आहे.

 

संविधान साक्षरता अभियानासाठी एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक साध्या, सोप्या आणि प्रवाही भाषेत भारतीय संविधानाची माहिती महाविद्यालयीन युवा, शिक्षक, प्राध्यापक, संविधानप्रेमी कार्यकर्ते, तसेच शेतकरी आणि कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवत असल्याने त्याचे खूप महत्व आहे असे प्रतिपादन बाबा आढाव यांनी या प्रसंगी केले. तसेच आपल्या वाढदिवस कार्यक्रमात ही महत्वाची भेट आपल्याला मिळाल्याचे बाबांनी आवर्जून सांगितले. “संविधान बचाव, देश बचाव” या मोहिमेत या पुस्तकाचे मोठे योगदान आहे असे मनोगत साथी सुभाष लोमटे यांनी मांडले.

 

महाराष्ट्रात आजवर संविधान साक्षरता अभियानात अडीचशेहून अधिक शिबिरे आणि एक हजारहून अधिक व्याख्यानांचे आयोजन झालेले असून त्यामुळेच या पुस्तकाला वाढता प्रतिसाद मिळत आहे असे पुस्तकाचे लेखक सुभाष वारे यांनी सांगितले तसेच या अभियानात योगदान दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.