पुणे

“महायुतीमध्ये बेकी तर महाविकास आघाडीत होणार का बिघाडी? हडपसर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या लक्षणीय, कोणाच्या पारड्यात विधानसभेची उमेदवारी यावर अवलंबुन विजयाची गणिते…

हडपसर /पुणे (अनिल मोरे )

लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगलेच यश मिळाले तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघात 14 हजार मतांची आघाडी भेटली, निवडणुकीच्या प्रचारात एकी असलेल्या महायुतीमध्ये धुसफुस असून महाविकास आघाडीमध्ये जागावाटप व उमेदवारीवरून बिघाडी होणार? अशी चिन्हे आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असून सर्वच पक्षांमध्ये तगडे उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत पण महायुती व महाविकास आघाडी कायम राहिली तर कोणाचा पत्ता कट होणार? उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? अद्याप गुलदस्त्यात आहे, युती आघाडी होणार किंवा नाही पण निवडणूक लढविणारच असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ.अमोल कोल्हे दुसऱ्यांदा निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील दुसऱ्यांदा पराभूत झाले. तीन वेळा हडपसर मतदार संघाने आढळराव पाटील यांना मताधिक्य दिले असताना या निवडणुकीत मात्र डॉ.कोल्हे यांच्या पाठीशी मतदार उभा राहिले, त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये आनंदाचे वातावरण असले तरी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.
डॉ.अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस यांचा सिंहाचा वाटा आहे, महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांच्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले, डॉक्टर कोल्हे निवडून आल्याने या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार असा आशावाद निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर विधानसभा निवडणुकीत प्रबळ दावेदार आहेत, तर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे, भारतीय जनता पार्टी कडून माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे हे प्रमुख दावेदार आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघात माळी मराठा जातीय समीकरण सर्वश्रुत आहे परंतु या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे वाढलेले मतदार निर्णायक आहेत, हा मतदार सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना पाहता कात्रज पासून मांजरी पर्यंत विस्तारलेला हा मतदार संघ शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्वात मोठा मतदार संघ आहे, उपनगर व ग्रामीण भाग या मतदारसंघात जोडला गेलेला आहे, या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांचा आग्रह आहे. महायुतीने निवडणूक स्वतंत्र लढवली तर विद्यमान आमदार चेतन तुपे माजी आमदार योगेश टिळेकर व प्रमोद नाना भानगिरे रिंगणात असतील,
महाविकास आघाडी अभेद्य राहील असे चित्र महाराष्ट्रात असल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच राहणार आहे, माझे महापौर प्रशांत जगताप व माजी आमदार महादेव बाबर दोघेही तुल्यबळ उमेदवार असून कोणत्या पक्षाला जागा सुटते यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. दोघांनाही विधानसभेची जोरदार तयारी चालवली असून काही झाले तरी निवडणूक लढविणारच असा चंग बांधला आहे.
महायुतीने एकत्रित निवडणूक लढविण्याचे ठरविल्यास विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पुन्हा संधी मिळेल भाजपचे माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख त्यावेळी काय भूमिका घेतात यावर निकाल अवलंबून आहे.

 

मतदारसंघात हा समाज निर्णायक….
हडपसर मतदारसंघात मराठा, माळी व मुस्लिम समाजाचे मतदान निर्णायक असून महायुती व महाविकास आघाडीचा कोण उमेदवार रिंगणात असणार कोण कोणाला आतून मदत करणार? कोण कोणाचा गेम करणार? याची व्युव्हरचना हे पक्षांच्या उमेदवारी वाटपावर अवलंबून असेल.