महाराष्ट्र

कौतुकास्पद…..पुणे पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेत उमटवला शारीरिक व मानसिक कणखरतेचा ठसा.

प्रतिनीधी -स्वप्नील कदम

जगातील सर्वात खडतर मानली जाणारी’ द अल्टिमेट ह्युमन राईट्स, द व्हॅली ऑफ थाउजंड हिल, असे ज्या अल्ट्रा मॅरेथॉन चे वर्णन केले जाते, अशी कॉम्रेड मॅरेथॉन… दक्षिण आफ्रिका येथील दर्बन ते पीटर मेरीज बर्ग या शहरादरम्यान दरवर्षी ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. जवळपास ९० किलोमीटर अंतराची व घाटमाथ्यावरील चढ व वळणे घेत जाणारी ही मॅरेथॉन जगभरातील फिटनेस प्रेमींचे आकर्षण असते. धावपटूंचा शारीरिक कस पाहून त्यांची दमछाक करणाऱ्या पाच मोठ्या टेकड्या व अनेक छोट्या टेकड्या या दरम्यान पार कराव्या लागतात. व मी-मी म्हणणाऱ्या धावपटूंच्या शारीरिक व मानसिक ताकतीची कसोटी पाहणारी अशी ही कॉम्रेड मॅरेथॉन… या मॅरेथॉनच्या स्टार्ट लाईनला उभे राहण्यापूर्वी तुमचा सरावही तितकाच दमदार हवा अन्यथा कॉम्रेड धावण्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.

 

दक्षिण आफ्रिका येथील हवामान भारतातील हवामानाशी तुलना करता बऱ्यापैकी थंड असते. परंतु भारतीय लोकांचा सराव हा जानेवारी ते मे या अतिशय उष्ण अशा वातावरणात करावा लागतो. सरावातील सातत्य हे खूप महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीतही पुणे शहरातील पाच पोलिसांनी मात्र कॉम्रेडचा हा विडा उचलला… यामध्ये विश्रामबाग विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ५५ वर्ष वय असलेले साईनाथ ठोंबरे, विशेष सुरक्षा विभाग येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप पांडुळे,कोंढवा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदार राहुल शितोळे,हडपसर वाहतूक विभागात कार्यरत पोलीस अंमलदार विठ्ठल कारंडे व चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत असलेले पोलीस अंमलदार अमोल आटोळे, तसं पाहिलं तर गेली अनेक वर्षापासून हे सर्वजण विविध अंतराच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन ती चांगल्या वेळेत पूर्ण करत असतात.परंतु यावर्षी कॉम्रेड मॅरेथॉनच्या आकर्षणापासून ते स्वतःला दूर ठेवू शकले नाहीत. आगामी काळात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्तव्यामध्ये काय वाढून ठेवले आहे याचा विचार न करता त्यांनी कॉम्रेडच्या रणांगणात थेट उडी घेतलीच व सराव सुरू केला.

 

कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी ४२.२ किलोमीटर अंतराची फुल मॅरेथॉन ४ तास ५० मिनिटाच्या आत पूर्ण करावी लागते. त्यासाठी वरील सर्व पोलीस यांनी भारतातील सर्वात नामांकित अशा टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवला. व सर्वांनी अतिशय चांगल्या वेळेत मॅरेथॉन पूर्ण करून कॉम्रेड मॅरेथॉन मधील सहभाग निश्चित केला. परंतु त्यानंतर मात्र त्यांच्या शारीरिक कसोटीचा खरा कस लागला कारण कॉम्रेडचा खरा सराव हा फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात असतो.. यापैकी अमोल आटोळे व विठ्ठल कारंडे यांनी पुण्यातील नामांकित प्रशिक्षक रोहन कुंभार सर यांच्याकडे प्रशिक्षण सुरू केले. तर साईनाथ ठोंबरे सर व संदीप पांडुळे यांनी सातारा येथील शिवस्पिरिट चे संस्थापक शिव यादव सर यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. राहुल शितोळे यांनी रून्होलिक्स. चे संस्थापक स्वतः एक नामांकित धावक असलेले डॉ.योगेश सातव सर यांच्याकडे प्रशिक्षणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. सराव तसा व्यवस्थित सुरू होता. परंतु त्यापैकी संदीप पांडुळे यांना टाटा मुंबई मॅरेथॉन नंतर रनर्स knee म्हणजेच गुडघ्याचे दुखणे सुरू झाले. व त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन व महिन्याभराचा सराव त्यांना करता आला नाही. परंतु काही दिवसातच जिद्दीने त्यावर मात करत पुन्हा सराव चालू केला.. त्यानंतर लोकसभा निवडणुका असल्याने विशेष सुरक्षा विभागाला यावेळेस खूपच तारेवरची कसरत करावी लागली व त्यामुळे पुन्हा लॉन्ग रनचा सराव सुद्धा करता आला नाही. तसेच यापैकी विठ्ठल कारंडे यांना कर्तव्य करत असताना त्यांचे डाव्या खांद्याला जोरदार दुखापत झाल्याने व डॉक्टरांनी त्यांना सक्तीची तीन महिन्याची विश्रांती सांगितलेली असताना देखील त्यांनी खचून न जाता धावण्याऐवजी २० ते ३०किलोमीटर डोंगर भागावर चालण्यास सुरुवात केली व सरावात कोणताही खंड पडू न देता अतिशय जिद्दीने सराव सुरू ठेवला.तसेच अमोल आटोळे यांना सुद्धा सरावातील शेवटच्या महिन्यात खूपच धावपळ करावी लागली कारण ते राहत असलेले सरकारी निवासस्थान हे त्यांना खाली करून नवीन निवासस्थानात जाण्याच्या धावपळीत त्यांचा सरावामध्ये खूपच खंड पडला. अगदी शेवटच्या दिवशी कॉम्रेड मॅरेथॉनला येत असतानाही त्यांचा लहान मुलगा हा दवाखान्यात ऍडमिट होता व अशा परिस्थितीतही त्यांना कॉम्रेड मॅरेथॉन साठी रवाना व्हावे लागले…

 

पोलिसांचे कर्तव्य हे अतिशय अनियमित असते व अशा स्थितीत प्रॉपर सराव व डायट याचा मेळ साधणे सोपे नाही. परंतु अगदी प्रशिक्षणापासून खंबीर मानसिकता व खडतर शारीरिक प्रशिक्षण याच्या जोरावर इतर गोष्टी थोड्याशा चुकल्या तरी त्यावर मात करण्याची जिद्द ही पोलिसांकडे नक्कीच असते.. तसं पाहिलं तर सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांची शारीरिक व मानसिक जिद्द ही सुद्धा खरोखर वाखण्याजोगी आहे. कारण सरावाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना लोकसभा निवडणूक व रात्रपाळी कर्तव्य यामध्ये सरावातील सातत्य राखता आले नाही.. अशा खडतर/ प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सराव करून सर्व पोलीस ऍथलेट यांनी दक्षिण आफ्रिका येथील कॉम्रेड मॅरेथॉन अतिशय चांगल्या वेळेत पार करून पूर्ण केली. यापैकी विठ्ठल कारंडे यांनी ८ तास ५५ मिनिटे अशी वेळ नोंदवत मानाचे बिल रोवन पदक,राहुल शितोळे यांनी ९ तास ४० मिनिट अशी वेळ नोंदवत रॉबर्ट मिशाले पदक व अमोल आटोळे आणि संदीप पांडुळे यांनी देखील १० तास ३० मिनिटे अशी वेळ नोंदवत कास्यपदक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे सर यांनीही ११ तास ५६ मिनिट अशी वेळ नोंदवित फिनिशर मेडल प्राप्त केले.तसेच या प्रवासात गोदरेज कंपनीचे विभागीय अधिकारी व यावर्षीच्या कॉम्रेड मध्ये ८ तास ५५ मिनिट वेळ नोंदवत बिल रोवन मेडल प्राप्त करणारे आयर्न मॅन ज्योतीराम चव्हाण सर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व साथ आम्हाला मिळाली..पोलीस कर्तव्य करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सराव करून कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये यश प्राप्त करणे हे खरोखरच उल्लेखनीय व वाखाण्याजोगी कामगिरी आहे.