पुणेमहाराष्ट्र

वटपौर्णिमा

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी |
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात् |
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

हिंदू महिला अशी सावित्रीची प्रार्थना करतात तो सण म्हणजे वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. वडाच्या झाडामध्ये ब्रह्रमा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते.

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडें असायला हवी तसेच प्राणवायू निर्माण करण्यासाठी झाडे आवश्यक आहेत.

निसर्गाचे संवर्धन केले तरच आपल्याला पुरक उण, वारा पाऊस मिळू शकतो म्हणून तर आपण म्हणतो झाडे लावा, झाडे जगवा ! आपल्या संस्कृतीने निसर्गाला देवता मानून त्याचं पूजन करून संवर्धन करण्याचं सूत्रच आपल्या परंपरेत सामावलेले आहे.

वटसावित्री पौर्णिमेला पारंपरिक कथा व प्रथा असली तरी यामागे निसर्गाचं संवर्धन हा फार मोठा हेतू सामावलेला आहे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणवारा मध्ये ज्ञान, विज्ञान सामावलेले आहे. इतर कुठल्याही धर्माच्या परंपरेत वृक्ष, प्राणी-पक्षी यांची पूजा आढळून येणारं नाही ! पिंपळ, उंबर, तुळस, आदी वृक्षांची पूजा केली जाते. गाय, बैल, म्हैस, कुत्रा, कासव कावळा आदी पशुपक्षी यांचेही हिंदू धर्मात असाधारण महत्त्व आहे. ही परंपरा हिंदू संस्कृती मध्ये सामावलेली आहे, ती इतर कुठल्याही धर्मात आढळून येत नाही !

सुधीर उध्ववराव मेथेकर ,
पुणे