पुणे

पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी ऑबस्टॅकल लिमिटेशन सरफेसेस (ओएलएस) सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यास यश

पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या ऑबस्टॅकल लिमिटेशन सरफेसेस (ओएलएस) सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली. यामुळे धावपट्टी विस्ताराला गती मिळाली आहे. विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढणार आहे.

 

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे ओएलएस सर्वेक्षणाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ओएलएस सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी हवाई दलाच्या मालकीची असल्याने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाची मंजुरी यासाठी आवश्यक होती.

मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना याबाबत पत्र लिहिले होते. तसेच राजनाथ सिंह यांची भेटही घेतली होती. त्यानंतर संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत ओएलएस सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली. या सर्वेक्षणामुळे धावपट्टीचा विस्तार करणे शक्य होईल व मोठ्या आकाराच्या विमानांना पुण्यातून उड्डाण करता येईल. आंतरराष्ट्रीय विमानसेवेत प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या विमानांचा समावेश असतो. त्यामुळे धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणार आहेत.

युरोपमधील देशांसह अमेरिका, जपानशी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा नसल्यामुळे पुण्याच्या वाढीवर गंभीर परिणाम होत आहे. मोठ्या विमानांच्या उड्डाणांवर छोट्या धावपट्टीमुळे मर्यादा येत आहेत. आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याने पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होईल.

 मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी हवाई वाहतूक