पुणे

कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीचा कठोर निर्णय: कचरा टाकणाऱ्यांना ५ हजार दंड, व्हिडीओ आणि फ्लेक्स व्हायरल होणार!

प्रतिनिधी स्वप्नील कदम

लोणी काळभोर (कदम वाकवस्ती) (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासनाने मोठा निर्णय घेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गाव विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून ५ हजार रुपये दंड आकारण्याचा व कचरा टाकणाऱ्याचा फ्लेक्स व व्हिडीओ प्रसिद्ध करण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला आहे. अशी माहिती उपसरपंच नसीर पठाण यांनी दिली आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवार (दि.२९) रोजी पार पडली. यावेळी कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, सलिमा पठाण, सुनंदा काळभोर, सिमिता लोंढे, मंदाकिनी नामुगडे, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर वरील प्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित या निर्णयाची अंमलबजावणी करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येत असलेल्या ठिकाणी या कारवाईचे फ्लेक्स लावले आहेत.

मागील चार महिन्यांपासून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ओला-सुका कचरा संकलन व घनकचरा व्यवस्थापन करीत आहे. घरोघरी जावून कचरा संकलन, वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक घरासाठी ६० रुपये व हॉटेल व्यावसायिकांना १५० रुपये मासिक शुल्क आकारले जात आहे. कचरा संकलनामुळे थोड्याच दिवसात कदमवाकवस्ती गाव कचरा मुक्त होऊन स्वच्छ होणार होते. मात्र काही नागरिक या योजनेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. कचरा टाकणाऱ्याचा फ्लेक्स बनवून प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती नासिर पठाण यांनी दिली.

कदमवाकवस्ती गावात स्वच्छ पुणे संस्थेच्या माध्यमातून घरोघर जाऊन कचरा गोळा केला जात आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांप्रमाणे कदमवाकवस्तीतील नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे. परंतु काही नागरिक घरातील कचरा हा कचरा वेचकांना न देता तो सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावाचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी तसेच गाव स्वच्छ व सुंदर बनवण्याच्या दृष्टीकोनातून उचललेले पाऊल हे एक महत्वाचे ठरणार आहे.

चित्तरंजन गायकवाड ( माजी सरपंच) – कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या संदर्भात घेतलेला हा निर्णय योग्य आहे. आपल गाव स्वच्छ ठेवणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तुम्हाला कामामुळे कचरा वेचकांकडे कचरा देणे शक्य नसेल तर कचरा घराबाहेर डस्टबिनमध्ये ठेवा. कचरा वेचक तुमचा कचरा उचलून घेऊन जातील. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता तो वेचकांनाच द्यावा. नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. अन्यथा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर गाव विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कचरा टाकणाऱ्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येईल.