हडपसरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मगरपट्टा परिसरातील वेदविहार सोसायटीत लोखंडी घसरगुंडी कोसळून एका चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे.
मृत बालिकेचे नाव अनिका नवनाथ देवीकर असून, ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिका सोसायटीच्या आवारात खेळत असताना मुलांसाठी बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी अचानक कोसळली आणि ती थेट तिच्या डोक्यावर पडली.
या अपघातात अनिका गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संबंधित घसरगुंडी योग्य पद्धतीने बसविण्यात आलेली नव्हती. ती काढून टाकण्याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे सोसायटी व्यवस्थापनाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साने करत आहेत.
