पुण्यातील खडकी परिसरातील 27 वर्षीय अमर कदम यांचा मृतदेह वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमर कदम हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, साईव खुर्द परिसरात त्यांचे ओळखपत्र, कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने शोधमोहीम तीव्र करण्यात आली.
हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमने खोल पाण्यात शोध घेतल्यानंतर अखेर त्यांचा मृतदेह सापडला.
त्यांनी ‘Everyone Sorry’ असा स्टेटस मोबाईलवर ठेवल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या कारवाईत पोलीस कर्मचारी अनिकेत सोनवणे, निवास जगदाळे, मंगेश कदम यांच्यासह हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे गणेश सपकाळ, संजय चोरघे, नारायण जावळकर, संतोष भगत आदींनी सहभाग घेतला.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
