पुण्यातील Koregaon Park परिसरातील नॉर्थ मेन रोड पुन्हा एकदा जड वाहनांच्या वाहतुकीमुळे चर्चेत आला आहे. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही दिवसाढवळ्या ट्रक, डंपर आणि मालवाहू वाहने सर्रासपणे या रस्त्यावरून धावताना दिसत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या जड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते, वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, वाहतूक पोलीस इतर कारवाईत व्यस्त असताना अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवत आहेत. इतकेच नव्हे तर, बांधकाम व्यावसायिक आणि काही उद्योजक शहरातील बंदी असतानाही मालवाहतूक सुरू ठेवत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
या मार्गावर यापूर्वी अनेक अपघात झाले असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. तरीही प्रशासन कठोर कारवाई का करत नाही? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
आता प्रशासन जागे होणार का? की आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार?
