पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. अप्पर डेपो परिसरातील ओसवाल दवाखान्यासमोर असलेल्या काळे अँड सन्स या गोडाऊनला दुपारी सुमारे १ वाजून २३ मिनिटांनी आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, मंडप साहित्याने भरलेल्या तब्बल आठ हजार चौरस फुटांच्या गोडाऊनमध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. कार्पेट, कापड आणि सजावटीच्या साहित्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. यामध्ये एक चारचाकी टेम्पो आणि सात दुचाकी वाहने जळून खाक झाली.
विशेष म्हणजे, आजूबाजूला दाट नागरी वस्ती असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र अग्निशमन दलाने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग इतर ठिकाणी पसरण्यापासून रोखली. या मोहिमेत तब्बल ७ अग्निशमन वाहने, ३ वॉटर टँकर, मनपाचे ११ टँकर आणि जवळपास ५० जवान सहभागी झाले होते.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणत मोठा अनर्थ टाळला.
