पुणे

पाच बहिणींचा नवसाचा भाऊ गेला! पाठलाग करून १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पुन्हा एकदा खूनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
रुई गावातील १८ वर्षीय राजेश उर्फ राजेंद्र कोरकाने याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी राजेश आपल्या मित्रांसोबत लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद शाळेजवळ बसला होता. त्यावेळी किरकोळ वाद झाला आणि हा वाद थेट रक्तरंजित हत्येपर्यंत पोहोचला.

जीव वाचवण्यासाठी राजेश गावातील एका जुन्या वाड्यात लपला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक बाब म्हणजे, आठ दिवसांपूर्वीही आरोपी आणि राजेश यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी नातेवाईकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते.
राजेश हा पाच बहिणींनंतर नवसाने झालेला एकुलता एक भाऊ होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.