पुणे

हडपसर महावितरणचा अधिकारी लाच घेताना रंगेहात! ACB ची धडक कारवाई

पुण्यातील महावितरण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हडपसर उपविभाग-2 मधील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोने मोठी कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टर असलेल्या तक्रारदाराने नवीन 12 वीजमीटर जोडणीच्या कामासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे यांनी प्रति मीटर एक हजार रुपये प्रमाणे 12 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार केली होती.
इतकेच नव्हे तर, अन्य एका नवीन इमारतीच्या वीज कनेक्शनसाठी तब्बल 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तपासादरम्यान आरोपी अधिकाऱ्याने यापूर्वी 4 हजार 500 रुपये घेतल्याचे मान्य केले आणि उर्वरित 7 हजार 500 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर 4 जून रोजी दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी हडपसर उपविभाग-2 कार्यालयात सापळा राबविण्यात आला. यावेळी रामचंद्र लोंढे यांनी 7 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, तपास अधिकारी सुहास हट्टेकर तसेच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, आरोपीविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.