पुणे

मुख्याध्यापकाने कुटुंबासह जीव घेतल्याची धक्कादायक घटना

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
हत्तीज गावात एका मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतल्यानंतर स्वतःचाही जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मृत व्यक्तीचं नाव योगेश पाटील असून ते नंदुरबार जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
प्राथमिक माहितीनुसार, पत्नी माधुरी पाटील आणि मुलं अथर्व व शिवांश यांना विष दिल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांना घटनास्थळी २२ पानांची चिठ्ठी सापडली असून त्याचा तपास सुरू आहे.

शेअर मार्केटमधील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आणि वाढत्या कर्जामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.