पुणे

उघड्या मॅनहोलने घेतला अस्लम शेख यांचा जीव! कुटुंबाचा संतप्त सवाल – पैशांनी माणूस परत येणार का?

मुंबईतील कुर्ला-साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमुळे एका निष्पाप व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेनंतर कुटुंबीयांचा संताप अनावर झाला आहे.
५५ वर्षीय अस्लम शेख हे मोबाईलवर बोलत रस्त्याने जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडले. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
महापालिका, अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तब्बल दीड तास शोधमोहीम राबवली. अखेर पुढील मॅनहोलमधून अस्लम शेख यांना बाहेर काढण्यात आले. मात्र राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्घटनेनंतर महापालिकेने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र अस्लम शेख यांच्या कुटुंबीयांनी संतप्त सवाल केला आहे, “पैशांनी आमचा माणूस परत येणार का?”
दरम्यान, या घटनेमुळे पावसाळ्यातील उघड्या मॅनहोलच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, जबाबदारांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.