पुणे

धनकवडीत थरार! आईवरून वाद, दगडाने हल्ला; तरुणाचा मृत्यू

पुण्यातील धनकवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकत्र बसून दारू पित असताना झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे.
धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलाखाली दोघे जण बसून दारू पीत होते. त्यावेळी झालेल्या वादादरम्यान आईवरून शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त झालेल्या आरोपीने जवळ पडलेल्या फरशीच्या दगडाने दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने संबंधित व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. वेगाने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.