मुंबई (विशेष प्रतिनिधी): मावळ वि शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे मागील दहा वर्षापासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. मावळात. २००९ च्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे आझम पानसरे यांना पराभव पत्करावा लागला होता. तर 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकाप व मनसेच्या पाठिब्यांवरअपक्ष निवडणूक लढवली त्यात खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. मागील पाच वर्षात खासदार बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात वारंवार शाब्दिक आरोप-प्रत्यारोप झाले. काही महिन्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी यापुढे फक्त लोकसभेची निवडणूक लढवणार असा ‘पण’ करून खासदार श्रीरंग बारणे यांना आव्हान दिले होते. परंतु भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे जगताप यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. सांगवीत जगताप यांनी पार्थ पवारांना हातात हात घेत शुभेच्छा ही दिल्या होत्या. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचा मोठा चाहता वर्ग आहे. 2014 मधील भाऊंच्या अपमानाची सल समर्थकांच्या मनात आजही आहे. त्यामुळे जगताप समर्थकांनी यावेळी काट्याने काटा काढायचा असे ठरवले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे.
मावळ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळा भेगडे आणि सचिन शेळके यांच्यात आगामी विधानसभेसाठी मोठी चुरस आहे. खासदार बारणे यांनी वेळोवेळी सचिन शेळके यांना पडद्यामागून मदत केली. भाजपमधील अनेक नाराज लोकांसोबत नेहमी संधान बांधत असल्यामुळे खासदार बारणे व आमदार भेगडे यांच्यात अंतर्गत कलह आहे. दोन दिवसापूर्वी मावळातील एका सामुदायिक विवाह समारंभावेळी आमदार भेगडे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यभागी राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. यावेळी अजित पवारांसोबत आमदार बाळा भेगडे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. त्याच वेळी उपस्थित असणाऱ्या खासदार बारणे यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या घड्या लोकांत चर्चेचा विषय बनला.

तसेच पनवेलमध्ये पूर्वश्रमाचे काँग्रेसचे नेते रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर व शरद पवार यांचे पूर्वीपासूनचे मित्रत्वाचे संबंध आहेत. विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर व अजित पवार यांची ही घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे एका मित्राचा नातू तर दुसऱ्याच्या मित्राचा मुलगा राजकीय करिअरची सुरुवात करत असताना ’दिल दोस्ती दुनियादारी’ साठी पार्थलाच समर्थ सार्थ देणार असे चित्र आहे.
