पुणे

पुतनीशी आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून काकाचा गोळीबार ; पुण्यात दिवसा थरार

महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज –
हिंजवडी मधील चांदणी चौकात सैराट चित्रपटाचा थरार घडला आहे. पुतणीशी आंतरजातीय विवाह केल्यावरून चुलता, भाऊ आणि साथीदारांनी जावयावर पाच गोळ्या झाडल्या. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री सातच्या सुमारास चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर घडली.

तुषार प्रकाश पिसाळ (वय 20, रा. राजेगाव, ता. भोर) असे जखमी जावयाचे नाव आहे. त्यानुसार राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे (सर्व रा. राजेगाव, ता. भोर), सागर पालवे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार आणि विद्या यांचा मागील काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला आहे. या विवाहासाठी विद्याच्या घरच्यांची संमती नव्हती. बुधवारी तुषार त्यांचे मित्र नान्या व बबन्या यांच्यासोबत मोटारसायकलवरून लग्नासाठी गेले. लग्नावरून परतत असताना ते चांदणी चौकातील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर आले असता विद्याचे चुलते राजू तावरे, भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी तुषारला घेराव घातला. राजू तावरे याने तुषारवर पिस्तूल रोखून मागून व पुढून अशा एकूण पाच गोळ्या झाडल्या.

यामध्ये तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. आरोपींनी तुषारला शिवीगाळ करून घटनास्थळावरून पळ काढला. तुषार याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x