पुणेमहाराष्ट्र

मराठी भाषा ज्ञान भाषा होणे गरजेचे : प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मातृभाषेतूनच आपल्याला ज्ञानाचे आकलन सहज व सोप्या पद्धतीने करता येते. आज नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्व प्राप्त झाले मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असला तरी मराठी ही ज्ञान भाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांना चांगले दिवस यायला हवेत. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘काव्यास्वाद’ या एक दिवसीय बहि: शाल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात कवी भालचंद्र कोळपकर, कवी म. भा. चव्हाण व कवी दशरथ यादव यांनी बहारदार कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.

 

जेष्ठ कवी म. भा. चव्हाण यांनी अभिजनांच्या भाषेपेक्षा बहुजनांची भाषा ही समृद्ध असून तिच श्रेष्ठ असल्याचे सांगितले. “मराठमोळा बोल आगळा…कुठून शिकलीस चाळा गं…रोकठोक हा सवाल आहे…कुण्या गावचा वानवळा गं…पैलतीरी तू उभी कधीची गं…ज्ञानेशाची विरहिणी …नाथाघरची गवळण भोळी…रोजच करते वेणीफणी “ ही रचना सादर करून मराठी भाषेची सौदर्यस्थळे उलघडून दाखवली.

 

साहित्यिक दशरथ यादव म्हणाले, ” सद्याची राजकीय व्यवस्था अस्थिर आणि समाजाला संभ्रमित करणारी असून सत्य बोलण्याचे धाडस कमी झाले आहे. पत्रकार, लेखक, कवी दबावात काम करीत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला असल्याचे सांगत त्यांनी “कसं म्हणू तुम्हाला धर्मवीर आम्ही…धर्मानेच केलाय घात कपटाने काढलाय कुरवा” ही शंभूराजांवरील कविता सादर केली.

 

कवी कोळपकर यांनी ‘बुलेट प्रेम’, ‘हीरोइन’, ‘भांडण’, ‘लाजरे पोरा’ आणि ‘बाप झाल्यावर’ या विविध विषयांवरील कविता सादर केल्या. त्यांनी अभ्यास सोडून प्रेमात पडणाऱ्या तरुणांची फजिती, हिरोईनशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाची कहाणी, नवरा-बायकोच्या भांडणाचे महत्त्व आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्यांवर मार्मिक भाष्य करत मराठी भाषेतील उपरोध, उपहास व विडंबनाचे स्वरूप विशद केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे , केंद्र कार्यवाह डॉ. नाना झगडे, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अर्चना जाधव, प्रा. सूरज काळे, प्रा. गणपत आवटी आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण ससाणे यांनी केले. प्रा. डॉ. नाना झगडे यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रा. सूरज काळे यांनी मानले.