दिनांक ०२ मार्च, २०२५ रोजी डॉ. सि.तु. (दादासाहेब) गुजर यांच्या १९ वा पुण्यस्मरण दिन आहे. त्यानिमित्ताने दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबीराचे उद्घाटन श्री. कृष्णकांत कोबल यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी, संस्थेचे कर्मचारी व इतर नागरिक यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरामध्ये एकूण ५५ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. अनिल गुजर, सहसचिव श्री. अरुण गुजर, श्री. दिगंबर माने व इतर संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सि. तु. (दादासाहेब) गुजर यांनी आरोग्य, शिक्षण व ग्रामीण/आदिवासी विकासात निःस्पृहपणे कार्य केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती / संस्थाना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी आरोग्य क्षेत्रातील पुरस्कार मा. डॉ. संजय देशमुख, इंद्रायणी हॉस्पिटल व कॅन्सर इन्स्टिट्युट, आळंदी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दलचा पुरस्कार डॉ. गिरीश कुलकर्णी व डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, स्नेहालय, अहिल्यानगर यांना शनिवार, दि.०१ मार्च, २०२५ रोजी स्व. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, माळवाडी, हडपसर, पुणे २८. येथे सायं. ५ ते ७ वाजता आयोजित कार्यक्रमामध्ये वितरित केले जातील अशी माहिती संस्थेचे चिटणीस, श्री. अनिल गुजर यांनी दिली.