वानवडी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
वानवडी येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) गट क्रमांक एकच्या सबसिडी कॅन्टीनमध्ये 63 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एसआरपीएफच्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश बबन वेठेकर (पोलीस कल्याणकारी अधिकारी, राज्य राखीव पालीस बल, गट क्र 1, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारी वरून वानवडी पोलिसांनी सहायक पोलीस उप-निरीक्षक रणजित जगन्नाथ जाधव (राज्य राखीव पोलीस बल, गट क्र 1 पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रमेश वेठेकर हे पोलीस निरीक्षक म्हणुन राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुणे येथे कार्यरत असुन या ठिकाणी पोलीस कल्याणकार अधिकारी म्हणुन नेमणुकीस आहे. त्यांना ग्रुपच्या सबसीडी कँन्टीनच्या रकमेत अपहार झाल्याबाबत संशय आल्याने त्यांनी कँन्टीनचे तपासणी केली असता त्यामध्ये तफावत झाल्याचे वेठेकर यांनी ही बाब समादेशक यांच्या निर्दशनास आणून दिल्याने या गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरीता एक समिती गठीत केली. या समितीने सबसीडी कँन्टीनमध्ये एकुण 62 लाख 98 हजार 956 रुपये 29 पैशांचा अपहार झाल्याबाबत अहवाल दिला. यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असुन वानवडी पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.